आकोट (अकोला): संत नरसिंग महाराजांच्या यात्रेच्या ठिकाणी आकाश पाळणे लावण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना, येथील नगरपालिका अभियंता व्ही. सी. बोरकर, लिपिक किशोर एडणे व शिपाई संजय र्मदाने यांना, बुधवारी सायंकाळी वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या पथकाने नगरपरिषद कार्यालयात रंगेहाथ पकडले. यात्रेनिमित्त माता मैदानावर आयोजित आनंद मेळाव्यात आकाश पाळणे लावण्याकरिता पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज करण्यात आला होता. सदर प्रमाणपत्र देण्याकरिता पालिकेचे बांधकाम अभियंता व्ही. सी. बोरकर व लिपिक किशोर एडणे यांनी २0 हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर रक्कम दोन टप्प्यात देण्याचे ठरले होते. दुसरीकडे याबाबत एसीबीकडे रीतसर तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. फिर्यादी बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास नगरपरिषदमध्ये ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याकरिता दहा हजार रुपयांची रक्कम घेऊन गेला होता. फिर्यादीने रीतसर शुल्क पावती फाडली व १0 हजार रुपयांची रक्कम बोरकर व एडणे यांना दिली. त्यापैकी आठ हजार रुपये बोरकर यांनी, तर दोन हजार रुपये एडणे यांनी ठेवून घेतले. त्यावेळी पालिका कार्यालयात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम लपविण्याचा प्रयत्न करणारा शिपाई संजय र्मदाने यालाही ताब्यात घेण्यात आले. पथकाने तिघांनाही पालिकेमधून शहर पोलिस ठाण्यात नेले आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. सदर कारवाई वाशिम येथील एसीबीचे पोलिस निरीक्षक विलास पाटील, सहायक उपनिरीक्षक गोकूळ पाटील, हेडकॉन्स्टेबल देशमुख, बाळू कंकाळ, संजय अंभोरे, शालिक घाटे, गजानन अवघडे यांनी केली. या घटनेमुळे पालिका क्षेत्रात व आकोट शहरात खळबळ उडाली. मोठय़ा प्रमाणात नागरिक व नगरसेवक पालिकेच्या आवारात जमा झाले होते.
आकोट पालिकेच्या अभियंत्यास लाच स्वीकारताना अटक
By admin | Updated: November 12, 2014 23:44 IST