कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करत असताना संशयित आरोपी समीर गायकवाडच्या जीवितास धोका पोहोचण्याचा संभव असू शकतो. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस मुख्यालय परिसरात खास ‘एके-४७’ घेऊन सुरक्षारक्षक नेमले आहेत. तसेच मुख्यालयातील अन्य चार प्रवेशद्वारे बंद केली आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करूनच दर्शनी बाजूने आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी ‘सनातन’चे काम करणाऱ्या समीर गायकवाडला अटक केली आहे. पोलीस मुख्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्षात त्याला ठेवले आहे. याठिकाणी २४ तास त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. समीरचे मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील संशयित फरारी रुद्रगौंडा पाटीलशी मैत्रीसंबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाटील या घटनेपासून फरारी आहे. गायकवाड याचे देशद्रोही, अतिरेक्यांशी हितसंबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने त्याला सशस्त्र पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. (प्रतिनिधी) कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२) याच्या सांगलीतील घरातून जप्त केलेले साहित्य रविवारी राजारामपुरी पोलिसांनी सीलबंद करून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला सांगली येथून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्या घराची आणि दुकानाची १४ तास झडती घेतली. यावेळी २३ मोबाईल, रॅम्बो चाकू, ‘सनातन’ धर्माची २० पुस्तके, कॅप, भित्तीपत्रके, हिशेबाच्या पावत्या, लग्नपत्रिका, बँकेचे पासबुक, डायरी, आदी साहित्य मिळून आले. हे संपूर्ण साहित्य पोलिसांनी जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात दिले होते. या साहित्याची पथकाचे प्रमुख आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पाहणी केली होती. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले होते. गेले तीन दिवस हा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात होता. (प्रतिनिधी)समीरच्या जीवितास धोक्याची शक्यतापोलीस मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची नेहमी वर्दळ असते. प्रवेशासाठी चारीही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. येथून पोलीस मुख्यालयात प्रवेश केला जातो. रविवारी दुपारपर्यंत ही प्रवेशद्वारे सुरू होती. संशयित गायकवाडसह प्रेयसी व काही नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात आहेत. पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांत विखुरला आहे. तसेच गुंतागुंतीच्या तपासात अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे संशयित गायकवाडच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी मुख्यालयातील चारही प्रवेशद्वारे बॅरेकेटस लावून बंद केली. तसेच दर्शनी बाजूचा एकच दरवाजा सुरू ठेवला. खास ‘एके-४७’ घेऊन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलीस मुख्यालयाला विशेष सुरक्षा सुरक्षारक्षकांकडे ‘एके ४७’ : समीर गायकवाडच्या सुरक्षेसाठी खबरदारी; पानसरे हत्येचा तपास
By admin | Updated: September 20, 2015 23:54 IST