कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)च्या दर्शनासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरातील अस्वच्छता, हेरिटेज वास्तूंची न घेतलेली काळजी आणि रखडलेला विकासनिधी यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका:यांची कानउघाडणी केली. यावेळी पवार यांनी मंदिरासाठी निधी आणणो ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर प्रदक्षिणा करताना त्यांना मंदिराच्या दगडी भिंतीचे टवके उडालेले दिसले. त्यावर संगीता खाडे यांनी संगमरवरी फरशी काढल्याने भिंतीची अशी अवस्था झाल्याचे सांगताच पवार यांनी ‘हेरिटेज वास्तूचे काम करताना काळजी घ्यायला पाहिजे होती. असे कसे काम केले?’ अशा शब्दांत सुनावले.
मंदिराच्या आवारात घालण्यात आलेल्या फरशीवरही त्यांनी ‘कसली पाय भाजणारी फरशी बसवलीय?’ असेही सुनावले; तर भवानी मंडप परिसरातील अस्वच्छतेबद्दल नगरसेवक आदिल फरास यांनाही दम दिला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्नी वरदा व मुलगी आदिती यांच्यासमवेत देवीचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)