सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ इंडियाने शेतकरी व मच्छीमारांसाठी कर्जाच्या विविध योजना आणल्या आहेत. यामध्ये जमीन विकत घेण्यापासून पीक लागवड, कृषी उपकरणांची खरेदी, गुरे खरेदी व कुक्कुटपालन तसेच शेतमालासाठी आवश्यक वाहन खरेदी व बोट खरेदीसाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे.बँकेकडून किमान वार्षिक ते जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत त्या त्या योजनेच्या व्याजदरांनुसार कर्ज दिले जाईल. जमीन सुधारणा आणि बागेच्या डागडुजीसाठी क्षेत्रानुसार ५ ते ७ वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज दिले जाईल. यासाठी सातबारा, ८ अ, कामाचे अंदाजपत्रक आदी कागदपत्रांची आवश्यकता असून या कर्जासाठी जमीन तारण ठेवली जाईल. आंबा, काजू, नारळ व बागधारक शेतकऱ्यांना हे कर्ज घेता येईल. तर पॉवर टिलर आणि इतर कृषी उपकरणांसाठीही बँकेकडून ५ ते ७ वर्षांसाठी कर्ज दिले जाईल. यासाठी ओलिताखाली ५ एकर जमीन किंवा ८ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरण्यात आले असून, १ लाखांच्या पुढे कर्ज हवे असल्यास जमीन तारण ठेवण्यात येईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.गाई व म्हशींच्या खरेदीसाठी ५ ते ७ वर्षे मुदतीचे कोटेशननुसार कर्ज दिले जाईल. तसेच जमीन खरेदी, कृषिपंप, सोलर वॉटर हीटर यांच्या खरेदीसाठीही बँकेकडून कर्ज दिले जाणार आहे. तसेच कृषी मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक वाहन खरेदीलाही बँकेकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. यासाठी ५ ते ७ वर्षांची मुदत आहे. शेतकऱ्यांबरोबरच मच्छीमारांसाठीही बँकेच्या विविध कर्ज योजना आहेत, ज्यात मासेमारीसाठी जाळी तसेच बोट खरेदीसाठी कर्ज मिळेल. मासेमारीसाठी कॅश क्रेडिटची योजनाही असल्याचे बँकेने म्हटले आहे. कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन बँक आॅफ इंडियाने केले आहे.
बँक आॅफ इंडियाची कृषी कर्जे
By admin | Updated: December 23, 2014 02:19 IST