अकोला : राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये डोनेशन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.राज्य शासनाने कृषी विद्यापीठांतर्गत नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली असून, जागादेखील वाढविल्या आहेत. तसेच खासगी कृषी महाविद्यालयांनाही अनुमती दिली आहे. राज्यात आजमितीस ६४ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. यात सात उद्यानविद्या, १६ जैवतंत्रज्ञान व आठ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील विदर्भात १६ कृषी, दोन उद्यानविद्या, एक जैवतंत्रज्ञान व एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेकडे (एमसीईएआर) आॅनलाइन अर्ज भरावे लागतात. एमसीईएआरकडून या अर्जांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तीन टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार इतर राज्यांतील विद्यार्थ्यांकरिता राखीव असतात. २० टक्के जागांवर व्यवस्थापन समितीव्दारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी एसीएईआरच्या यादीत विद्यार्थ्यांचे नाव असणे अनिवार्य असते. म्हणूनच जो तीन टक्के केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जातो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घातला जात आहे. या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)
कृषी महाविद्यालये ‘हायजॅक’
By admin | Updated: July 2, 2014 05:05 IST