ठाणे : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पाठलाग करून सोनसाखळी चोरट्याला पकडल्याची घटना ताजी असतानाच रविवारी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आबासाहेब मोहिते यांनी दक्ष नागरिक सुशील साव यांच्या मोटारसायकलवरून ५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करीत श्याम रेवणकर या चोरट्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. मोहितेंच्या या कामगिरीबद्दल पोलीस दलातून कौतुक होत असले तरी एक साधा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी बोळवण केली आहे. शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यामुळे ठाणे शहर गुन्हे शाखेने त्याला आळा घालण्यासाठी विशेष जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. तरीही, हे प्रकार कमी झालेले नाहीत. त्यातच रविवारी सकाळी कॅसल मिल परिसरात एका महिलेच्या गळ्यातील चेन खेचून दोन मोटारसायकलस्वार तीनहात नाकामार्गे मुंबईच्या दिशेने जात होते. याच वेळी साव यांनी कापूरबावडी येथे कार्यरत असलेल्या वाहतूक शाखेच्या मोहिते यांना हा प्रकार सांगितला. त्याच वेळी माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहतूक नियमन करीत असलेल्या मोहितेंनी विलंब न करता साव यांच्याच मोटारसायकलवर बसून पाठलाग सुरू केला. हा पाठलाग कोपरी पूर्व येथील धोबीघाटपर्यंत सुरू असतानाच चोरट्यांनी तेथे मोटारसायकल सोडून नागरी वस्तीत धाव घेतली. त्यानंतर, गल्लीबोळात पाठलाग सुरू असताना रेवणकर याला ठाणेकरवाडी येथे पकडले. दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. मोहितेंच्या या कामगिरीचे वाहतूक शाखेसह पोलीस दलात कौतुक होत आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी कोणतेही बक्षीस न देता त्यांना केवळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. पोलीस आयुक्त त्यांना बक्षीस जाहीर करतील, असेही त्यांनी सूचित केले. अशा प्रकारची कामगिरी वाहतूक पोलिसांनी करण्याचे आवाहनही करंदीकर यांनी केले. (प्रतिनिधी)
थरारक पाठलागानंतर सोनसाखळी चोरट्याला पकडले
By admin | Updated: August 18, 2014 03:55 IST