- वैभव बाबरेकर
अमरावती, दि.19 - मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली. समाजमन सुन्न करणारा हा गंभीर प्रकार तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावी उघडकीस आला. जयश्री सुरेश दुधे (३५) असे या अत्याचारग्रस्त महिलेचे नाव आहे.कुऱ्हा येथील भाऊराव कुऱ्हाडे यांची कन्या जयश्रीचे २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील सुरेश दुधे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुखी संसार सुरू झाला. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झालीे. सुखी संसारावर तीन वर्षांपूर्वी आघात झाला. जयश्रीचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाले. सासरच्या मंडळीने जयश्रीला छळणे सुरू केले. सुरेश यांच्या नावाने माहूर येथे १३ एकर शेतजमीन आहे. त्या शेतीच्या हव्यासापोटी हा छळ होता. जयश्रीने आई-वडिलांना सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळीने संधी मिळू दिली नाही. एकदा नातवांना भेटण्यासाठी म्हणून जयश्रीचे वडील भाऊराव यांनी माहूर गाठले. त्यावेळी सासरकडून होणाऱ्या छळाची माहिती जयश्रीने त्यांना दिली. भाऊराव यांनी जयश्रीला माहेरी आणले. सारेच सुरळीत सुरु असताना संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या सासरकरांनी जयश्रीच्या माहेरी जाऊन गोडीगुलाबीने तिला पुन्हा सासरी नेले. ती माया फसवी होती. जयश्रीचा पुन्हा अनन्वीत छळ सुरू झाला. वर्षभर आई-वडिलांशी ती संपर्क करू शकली नाही. 'हातावर कमावणे, पानावर खाणे' अशी स्थिती असल्याने वडीलही फारसे मागोवा घेऊ शकले नव्हते. त्याचाच गैरफायदा घेवून सासू, सासरे आणि दीर यांनी जयश्रीला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवले. अपुरे जेवण दिले. मारहाण केली. जयश्री आता हाडाच्या सापळ्यात रुपांतरित झाली आहे. तिचे डोळे निकामी झाले आहेत. १४ जुलै रोजी सासरच्या मंडळीने जयश्रीला मरणासन्न स्थितीत कुऱ्हा येथील वडिलांच्या घराबाहेर आणून सोडले. ग्रामस्थांनी माहुरकरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोबारा ठोकला. वडिलांनी तिला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. आता तिच्यावर अमरावतीत अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. 'त्या' तीन चिमुकल्यांची काळजी घेणार कोण?जयश्रीला संकेत (९), ऐश्वर्या (७), प्रणव (५) अशी तीन मुले आहेत. त्यांचे संगोपन सासरची मंडळी करीत असली तरी जयश्रीच्या पित्याला नातवंडांची चिंता आहे. वडिलांची छत्रछाया गमावलेल्या, आई मरणाच्या दारात असलेल्या त्या चिमुकल्यांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही.
कुऱ्हा पोलिसांची असंवेदनशीलताभाऊराव कुऱ्हाडे यांनी जयश्रीवरील अन्यायाची तक्रार १५ जुलैला कुऱ्हा पोलीस ठाण्यात नोंदविली. अद्यापपर्यंत पोलिसांनी तिचे बयाणसुध्दा नोंदविले नाही. जयश्री अत्यवस्थेत असताना कुऱ्हा पोलिसांनी केलेले दुर्लक्ष संतापजनक आणि स्री अत्याचाराला बळ देणारे आहे.
यांनी दाखविली माणुसकी...जयश्रीला न्याय मिळावा, या उद्देशाने विवेक बिंड, संतोष धुमाळे, मनीष पोकळे, राजेश बिंड यांनी यांनी मदत केली. पोलिसांकडेही पाठपुरावा केला.माझ्या मुलीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिला अन्न पाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभरापासून डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे ती कमालीची अशक्त झाली आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीे. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागितली, उपयोग झाला नाही. भाऊराव कुऱ्हाडे, जयश्रीचे वडीलमहिलेच्या छळाविषयी माहिती प्राप्त झाली. संबंधित ठाण्याला तत्काळ दखल घेण्याच्या सूचना दिल्या. गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. - लखमी गौतम, पोलीस अधीक्षक, अमरावतीअन्नपाण्याविना महिला अशक्त झाली आहे. तिच्या सर्व तपासणी करून तिला हायप्रोटीन डायट देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. आम्ही योग्य काळजी घेत आहोत. - अरुण राऊत,जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती अन्नपाण्याविना जयश्रीे अत्यंत अशक्त झाल्या आहेत. त्यांच्या हाडाचा सापळा दिसू लागला आहे. प्रकृती गंभीर असून उपचार सुरू केले आहेत. - सुनीता मेश्राम,वैद्यकीय अधिकारी, आयसीयू