शरद वाघोलकर/ गांधीग्राम (अकोला): आई व मुलाच्या नात्यातील प्रेमाची महती नेहमीच चर्चिली जाते. प्रेमाचा असाच ओलावा मुलाच्या व पित्याच्या नात्यातही बरेचदा जाणवतो. राजा दशरथाने पुत्र वियोगात प्राण त्यागल्याची पौराणिक कथा सर्वश्रुत आहे. मुलाच्या निधनानंतर पित्याने प्राण सोडल्याची अशीच मन हेलावणारी घटना अकोल्यापासून १२ किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम येथे ह्यफादर्स डेह्णला दुपारी ३.३0 वाजता घडली. गांधीग्राम येथील सुखदेव लक्ष्मण सदांशिव यांना तीन मुलींपाठोपाठ झालेला अशोक हा एकुलता एक मुलगा. वायरमन म्हणून काम करून तो उदरनिर्वाह चालवित असे. वडिलांनी आयुष्यभर मोलमजुरी करून मुला-मुलींची लग्ने पार पाडली; पण वयाची ऐंशी गाठल्यानंतर त्यांच्याकडून कष्टाची कामे होत नसल्याने घर चालविण्याची जबाबदारी अशोकवर येऊन पडली. त्याची पत्नीही मोलमजुरी करून हातभार लावत असे. या व्यापात अशोकला क्षयरोगाने ग्रासले. आपल्याला आजार झाल्याचे त्याला कळल्यानंतर त्याने उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असतानाच तो वायरमनची कामे करीत असे. त्याच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अशातच रविवार, २१ जून रोजी त्याचे निधन झाले. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशोकची अंत्ययात्रा दुपारी २ वाजता निघाली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून गावकरी व नातेवाईक मंडळी घरी पोहोचत नाही तोच, पुत्रवियोगाने अशोकचे वडील सुखदेव सदांशिव यांनीही प्राण सोडले. या घटनेने त्यांचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले. पुत्राच्या निधनाच्या दु:खामुळे पित्याचा मृत्यू झाल्याने एकाच दिवशी मुलापाठोपाठ पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी नातेवाईक व गावकर्यांवर आली. आता कुटुंबात अशोकची आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
मुलाच्या निधनानंतर पित्यानेही त्यागले प्राण
By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST