ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्वबळावर लढली आणि त्यांना ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही पक्षाने सर्व नगरसेवकांना अलिबागला नेले आहे. दगाफटका होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले असले, तरी सेना नेत्यांनी त्याचा इन्कार केला आहे. निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी ही पिकनिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वांना एकत्रित अलिबागला नेल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. या नगरसेवकांना अज्ञातवासात नेले नसून केवळ निवडणुकीतील शीण घालवण्यासाठी हा दौरा आयोजित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्ज भरण्यासाठी येणारे मोजके नगरसेवक वगळता उरलेले नगरसेवक आता थेट ६ तारखेला महापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवशी हजर होतील, अशी माहिती हाती आली आहे.दरम्यान, २०१२ मध्ये युतीला बहुमत मिळाले असतानादेखील एक महिला नगरसेविका गायब झाली होती. त्यामुळे या मुद्यावरून चांगलेच रण माजले होते. त्यामुळे या वेळी स्पष्ट बहुमत मिळवूनही कोणताही दगाफटका नको म्हणूनच ही खेळी खेळली गेली आहे. यामध्ये नव्या उमेदवारांना ज्येष्ठांच्या नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचे समजते. (प्रतिनिधी) हा अज्ञातवास नव्हे!स्पष्ट बहुमतामुळे शिवसेना नगरसेवकांना अज्ञातवासात जाण्याची गरज नाही. त्यामुळे ही पिकनिक असल्याचे सेना नेते सांगत आहेत. पुढील पाच वर्षांत कसे काम करावे, सभागृह कसे चालवावे, हे ज्येष्ठ नगरसेवक त्यांना शिकवणार आहेत.
स्पष्ट बहुमतानंतर ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांची पिकनिक
By admin | Updated: March 2, 2017 03:33 IST