२० गोळ्या झाडल्या, जागीच मृत्यू : वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीसुरेश रंगारी - कोठारी (चंद्रपूर)आजवर सात जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला अखेर मंगळवारी सायंकाळी गोळ्या घालून ठार करण्यात आले. बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी ते उमरी मार्गावर वन विभागाच्या विनोद नामक शार्पशूटरने या वाघाचा वेध घेतला. दरम्यान, मृत वाघाला पाहण्यासाठी १० ते १५ हजार लोकांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला होता.गर्दीला थोपविण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करावा लागला होता. वाघाला ठार मारण्यासाठी २० गोळ्या झाडण्यात आल्या; पैकी १५ गोळ्या वाघाला लागल्या. त्यात गंभीर जखमी होऊन वाघाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी जंगलातील कक्ष क्रमांक ५१६ मध्ये हरविलेला बैल शोधण्यासाठी गेलेल्या दत्तू ढोले या ३५ वर्षीय इसमाला वाघाने ठार मारले होते. यापूर्वीही वाघिणीच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला. त्यातून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे आली. वाघाचे वाढते हल्ले लक्षात घेता, रविवारी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांनी वाघाला दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच वन विभाग व पोलीस यंत्रणेने डोंगरहळदी कक्ष क्रमांक ५१६ मध्ये संयुक्तरीत्या सर्च आॅपरेशन राबविले. वाघाला पकडण्यासाठी या परिसरात दोन पिंजरेही लावण्यात आले होते. सर्च आॅपरेशन सुरू असताना सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी डोंगरहळदी ते उमरी मार्गावर असलेल्या एका पुलानजीक वन विभागाच्या शूटरला वाघ दिसताच, त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्यात गंभीर जखमी होऊन वाघ जागीच मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील उमरी, डोंगरहळदी, आंबेधानोरा, विहीरगाव, पोंभुर्णा येथील हजारो लोकांनी मृत वाघाला पाहण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. या गर्दीला थोपविण्यासाठी उमरी व पोंभुर्णा येथून पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच, कोठारी वनपरिक्षेत्राचे क्षेत्र अधिकारी डी.एम. उके, चिचपल्ली वनपरिक्षेत्राचे क्षेत्र अधिकारी राठोड आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृत वाघाला चंद्रपूर येथील रामबाग नर्सरीत नेण्यात आले आहे. आता गावकरी सुखाने झोपतीलयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विधानपरिषद सदस्या शोभाताई फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, नरभक्षी वाघामुळे गावकरी हवालदिल झाले होते. ते आता सुखाने झोपतील. वन विभागाने वाघाला ठार मारावे अन्यथा आम्हीच मारू, अशी भूमिका गेल्या सोमवारी त्यांनी घेतली होती. (वार्ताहर)ठार वाघ नरभक्षी नसल्याची शंकाकोठारी वन परिक्षेत्रात १८ आॅगस्टपर्यंत वाघाच्या हल्ल्यात सात जणांचा बळी गेला. त्यात सुनीता दीपक चितार्लेवार (३५, रा.पोंभूर्णा), महादेव दशरथ ठाकूर (४५, रा.चकबेरडी), प्रकाश लिंगा पेंदोर (४०, रा.भटारी), जुबेदा शेख (५०, रा.मानोरा), वच्छला इंदशाह शेडमाके (रा.देवई), पांडुरंग आत्राम (५५, रा.घनोटी) व दत्तू ढोले (३५, रा.डोंगरहळदी) यांचा समावेश आहे. मात्र यातील दत्तू ढोले वगळता इतरांवर वाघिणीने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ठार झालेला वाघ हा खरच नरभक्षी होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकशीची मागणीमारण्यात आलेला वाघ नरभक्षीच होता, हे शूटरने कसे ठरविले, असा प्रश्न उपस्थित करीत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर येथील जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र काकडे यांनी केली आहे.
अखेर ‘त्या’ नरभक्षी वाघाचा खात्मा
By admin | Updated: August 20, 2014 01:03 IST