दिवसभर दिल्लीकडे लक्ष: तयारीचीही लगबगनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा मंगळवारी होणार, अशी चर्चा असल्याने दिवसभर जिल्हा प्रशासनाचे लक्ष या घोषणेकडे लागले होते. नुसतेच लक्षच नव्हे तर निवडणुकीच्या तयारीचीही लगबग सुरू होती. मात्र सांयकाळी ६ वाजेपर्यंत वाट पाहूनही काहीच संदेश प्राप्त न झाल्याने, आता आयोगाच्या पुढील घोषणेकडे निवडणूक यंत्रणेचे लक्ष लागले आहे.गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल व त्यासाठी मंगळवारपासून आचारसंहिता लागू केली जाईल, असा अंदाज राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून व्यक्त केला जात होता व त्या अनुषंगाने पावलेही उचलली जात होती. मंगळवारी सकाळपासूनच आयोगाच्या घोषणेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले होते. आयोगाने घोषणा केली व कार्यक्रम जाहीर केला की, त्यानंतरच्या पुढच्या कार्यवाहीसाठी यंत्रणेला तयार ठेवण्यासाठी दिवसभर प्रशासनाची लगबग सुरू होती. याच अनुषंगाने बुधवारी सकाळी विविध विभागप्रमुखांची बैठकीचे, दुपारच्या सत्रात राजकीय पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींच्या बैठकीचे आणि सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या स्थानिक तयारीची माहिती देण्याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकांची घोषणाच न केल्याने, आता आयोगाच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहणे सुरू आहे.निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. एकदा घोषणा झाली की, नेहमीप्रमाणे तयारीची गाडी सुसाट वेगाने धावणार आहे. बाराही मतदारसंघांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी तयार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे याकरिता प्रत्येक विधानसभेसाठी भरारी पथक, व्हिडिओ शूटिंग करणारे पथक, खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. ईव्हीएमची तपासणी आणि प्रतिरूप मतदानाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. गाड्यांची व्यवस्था, मतदार नोंदणी आणि तत्सम कामाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
प्रशासन सज्ज, प्रतीक्षा आयोगाची
By admin | Updated: September 10, 2014 00:46 IST