सांगली : शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनासह विविध कारणांसाठी दोषी धरून गुरुवारी सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार यांना राज्य शासनाने निलंबित केले. महसूल विभागाच्या मुख्य सचिवांच्या सहीची निलंबनाची नोटीस सायंकाळी त्यांना बजावण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निलंबनामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. विजयकुमार पवार दोन वर्षांपूर्वी सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यापूर्वी त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. ते मूळचे मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील आहेत. रूजू झाल्यापासून वेळोवेळी ते वादग्रस्त ठरले होते. त्यांना जिल्ह्यात रूजू होऊ देऊ नये यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची नियुक्ती सुमारे सहा महिने रखडली होती. कामामध्ये चुकारपणा करणे, कार्यालयात वेळोवेळी सूचना न देता गैरहजर राहणे, सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयात गैरवर्तन करणे, न्यायिक सुनावण्या बेफिकीरपणे करणे, वकिलांशी गैरवर्तणूक आदी कारणांवरून गुरुवारी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत महसूल आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. वकिलांनीही त्यांच्याविरोधात लेखी तक्रारी दिल्या होत्या. सायंकाळी महसूल विभागाचा आदेश आल्यानंतर त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)या पदावरील दुसऱ्यांदा कारवाईसांगली जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीला दुसऱ्यांदा निलंबित व्हावे लागले आहे. यापूर्वी २००० मध्ये तांदूळ घोटाळ्याप्रकरणी दोषी धरून तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब शिंदे यांना शासनाने निलंबित केले होते. पवार यांच्या निलंबनाचा कालावधी मात्र अद्याप उघड करण्यात आलेला नाही.
सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी निलंबित
By admin | Updated: June 5, 2015 00:21 IST