संदीप प्रधान, मुंबईभारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. गेली पंधरा वर्षे सत्ता उपभोगलेल्यांच्या पालख्या पुढील पाच वर्षे उचलाव्या लागणार असतील तर अशी सत्ता येऊन काय कामाची, असा सवाल कार्यकर्ते खासगीत करीत आहेत.भाजपामधील अन्य पक्षीयांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची कबुली खडसे यांनी दिली. मात्र त्या कार्यकर्त्यांचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा केला. ज्या मतदारसंघात भाजपाची परि स्थिती मजबूत नाही. जेथे गेल्या २५ वर्षांत पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही अशा ठिकाणी पर पक्षातून प्रवेश दिले जात आहेत, असे ते म्हणाले. शिवाय पक्षात प्रवेश करणाऱ्यांपैकी केवळ एक-दोघांचा अपवाद वगळता इतरांना उमेदवारी नको आहे, असे ते म्हणाले.खडसे यांचा दावा काहीही असला तरी अन्य पक्षातून येणारी मंडळी ही एकतर भाजपाचे सरकार आल्यास वेगवेगळ््या यंत्रणांकडून संरक्षण मिळावे याकरिता किंवा त्यांच्या सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक लाभ मिळत राहावा याकरिता येत आहेत,असे कार्यकर्त्यांचे मत आहे. गावित, पाचपुते यांना पक्षात घेतल्याने कदाचित ते दोन-चार मतदारसंघ भाजपाकडे येतील. मात्र अन्यत्र त्यांच्या प्रवेशाचा फटका बसणार नाही याची काय खात्री, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. प्रवेश करणाऱ्या काहींनी कुठलीही उमेदवारी मागितली नसली तरी भविष्यात राज्यसभा, विधान परिषद, महामंडळांची अध्यक्षपदे यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून येणारी ही मंडळी दावा करणार. अशावेळी भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही, अशी चिंता कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत.
‘इनकमिंग’वर कार्यकर्ते नाराज
By admin | Updated: September 10, 2014 03:06 IST