मुंबई : मुंबईत जुन्या व मोडकळीस आलेल्या १४ हजार सेस इमारती असून त्यापैकी ५ हजार इमारतींचे बांधकाम सुरु आहे. पण अनेकांनी त्यात राहणाऱ्यांना घराबाहेर काढून तीन वर्षे उलटून गेली तरीही काम सुरु केलेले नाही. ज्या ठिकाणी भाडेकरुंना घराबाहेर काढले गेले पण तीन वर्षापासून कामात कोणतीही प्रगती झालेली नाही अशा बिल्डरांना दिलेली एनओसी रद्द केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.मुंबई महानगरासंबंधी अनेक विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सविस्तर निवदेन केले. मुंबईच्या विकास प्रकल्पांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल, असे सांगून ते म्हणाले, सिडकोने स्थापनेपासून १ लाख २४ हजार परवडणारी घरे उभारली आहेत. मात्र येत्या पाच वर्षात सिडकोच्या वतीने नवी मुंबई, नयना क्षेत्रात ५४,६३७ घरे बांधली जातील. त्यामुळे या भागात गोरगरिबांना परवडणारी घरे मिळतील. येत्या ६ महिन्यात २३५ चौ. किमी. चा आराखडा जाहीर केला जाईल. नवीमुंबईपेक्षा मोठी मुंबई या माध्यमातून उभारली जाईल. मात्र ते करत असताना वेगवेगळ्या गावांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिडकोत आणखी २ आयएएस दर्जाचे व्यवस्थापकीय संचालक नेमले जातील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील पोलिसांच्या घरांना ४ एफएसआय देण्याचे मान्य करण्यात आले असून त्यामुळे पोलीसांना शासकीय घरे मिळतील. मुंबई महापालिकेच्या २८ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे दिली जातील आणि हीच कल्पना राज्यातील सगळ्या पालिकांमध्ये राबवली जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. म्हाडाच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करुन ५ लाख घरे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, धारावीची नवीन बांधकाम नियमावली तयार केली जात आहे. ती देखील लवकरच जाहीर केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)
सेस बिल्डिंगचे काम न करणा-यांवर कारवाई
By admin | Updated: April 6, 2015 23:19 IST