इंदापूर : काँग्रेसचे कार्यकर्ते दीपक जाधव व त्यांचे बंधू दिनेश जाधव यांच्यावर राजकीय दबावाने खुनाचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या गुन्ह्यातून त्यांची नावे व इतर आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे कलम रद्द करण्यात यावे, अशा मागण्या तालुका काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक व इतरांकडे रविवारी करण्यात आली आहे.दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, बापू जामदार, शेखर पाटील, मंगेश पाटील, विलास वाघमोडे, प्रमोद राऊत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.अॅड. यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांची भेट घेतली. चर्चा करुन निवेदन सादर केले. काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, दीपक जाधव यांनी पळसदेव बिजवडी गटातून काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दबावाला बळी पडून या प्रकरणातील फिर्यादीने राजकीय हेतूने आरोपींविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे. फिर्याद दाखल करताना फिर्यादीने सुरुवातीला दीपक व दिनेश जाधव यांची नावे घेतली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणून आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरील घटना घडली त्या वेळी दीपक जाधव व दिनेश जाधव परगावी होते. गुन्ह्याची सखोल चौकशी करावी. दीपक जाधव व दिनेश जाधव यांची नावे गुन्ह्यातून कमी करावीत. आरोपींविरुद्ध चुकीने लावण्यात आलेले कलम ३०७ रद्द करण्यात यावे अन्यथा खोट्या गुन्ह्याविरुद्ध सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. या गुन्ह्यात जाधव बंधूंचा सहभाग नसेल तर योग्य ती पावले उचलली जातील. पत्रकारांशी बोलताना हंकारे म्हणाले, या प्रकरणातील फिर्यादीला अमानुष मारहाण झाली आहे. त्यामुळेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधवबंधू वगळता इतर पाच आरोपींना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)
राजकीय दबावाने गुन्हा दाखल केल्याचा आरोप
By admin | Updated: February 27, 2017 01:10 IST