कामशेत : ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर मुंबईच्या दिशेने अंडी घेऊन चाललेला भरधाव ट्रक पुढे जाणाऱ्या क्रेनवर जोरात धडकल्याने अपघात झाला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या या अपघातात चालकासह दोन जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रकमधील अंडी संपूर्ण मार्गावर पसरल्याने काही काळ वाहतूककोंडी झाली होती.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान सकाळी व्यंकटसाई ट्रान्सपोर्ट कंपनीचा अंड्यांची वाहतूक करणारा ट्रक (केए ३९ -५९३८) समोर जाणाऱ्या जयदीप क्रेन सर्व्हिसेसच्या क्रेनवर (एमएच १४ एझेड ९०३४ ) जोरात आदळल्याने चालकासह दोनजण जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर ट्रकमधील अंड्यांचे ट्रे व अंडी रस्त्यामध्ये विखुरल्यानेच तसेच अंडी फुटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. कामशेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आयआरबी कंपनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून लोणावळा नगर परिषद अग्निशामम दलाच्या बंबाच्या साहाय्याने रस्ता साफ करून त्यावर कच टाकली व रस्ता वाहतुकीस खुला केला. सकाळी सकाळी झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने सुटीनिमित्त, तसेच लग्नसराईचा हंगाम असल्याने लग्नकार्यासाठी निघालेल्या नागरिकांना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले होते. ट्रकची चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो मागून क्रेनवर आदळल्याने अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती, की दोन्ही वाहने एकमेकांत अडकली. ती वेगळी करणे अवघड जात होते. अपघातानंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.जुना महामार्ग : दुचाकी अपघातात ४ जखमीतळेगाव दाभाडे : दुचाकीला अज्ञात वाहनाची ठोकर बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील चौघेजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील येथील एनएचईसी कंपनीसमोर झाला. दुचाकी सोमाटणे फाटा येथून तळेगावकडे येत असता अज्ञात वाहनाची दुचाकीस ठोकर बसली. अनंत महादेव जानराव (वय 36), त्यांची पत्नी आशा (वय 33), मुलगा सोहम (वय 5)व भारती गोवर्धन गायकवाड(वय 17, सर्व रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. त्यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सोहम यास गंभीर दुखापत झाल्याचे समजते.पर्यटकांमुळे पुन्हा ‘ट्रॅफिक जॅम’लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : उन्हाळी सुटीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने रविवारी सलग दुसऱ्या आठवड्यात खंडाळा बोरघाटात वाहतूककोंडी झाली होती.‘एक्सप्रेस वे’वर सकाळपासूनच मुंबईकडून लोणावळा व पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या वाढू लागल्याने खंडाळा बोर घाटात अंडा पॉइंट ते अमृतांजन पुलादरम्यान वाहनांची मोठी कोंडी झाली होती. अतिशय संथ गतीने वाहने घाटातून मार्गक्रमण करीत होती. अवजड वाहनचालकांना घाट चढताना कसरत करावी लागत असल्याने अनेक ठिकाणी सर्रास लेन कटिंग होऊन वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मागील आठवड्यातही अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाका परिसरात वाहतूककोंडी झाली होती. सार्वजनिक सुटीच्या काळात वाहनांची संख्या वाढल्याने घाट परिसरात होणारी वाहतूककोंडी ही नित्याची बाब बनली आहे. यावर महाराष्ट्र शासन व रस्ते विकास महामंडळ यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या भावना वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
एक्स्प्रेस वे ठरतोय अपघाती मार्ग
By admin | Updated: May 8, 2017 03:06 IST