मुंबई : शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचारी निवृत्त झाल्यास रिक्त जागांवर पदोन्नती करू नये, असे निर्देश देण्यात आलेले नाहीत. शासन निर्णयात याचा उल्लेख नसतानाही शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही. यामुळे त्यांचे नुकसान होत असून, कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्या, अशी मागणी शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनेक शाळांमध्ये पदे रिक्त आहेत. याचा परिणाम शाळेच्या कामकाजावर होऊ नये, म्हणून मुंबईतील अनेक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत, पण शिक्षण विभाग ते नाकारत आहे. शासनाने सुधारित आकृतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत, शाळेच्या नवीन किंवा रिक्त जागेवर भरती करता येणार नाही, असे आदेश आहेत. मात्र, विभागाने असे आदेश काढूनही प्रत्यक्षात रिक्त जागेवर पदोन्नती देण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देता येऊ शकते. त्यामुळे अनेक शाळांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्यांनीही मान्य करावे, अशी मागणी परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती मान्य करा
By admin | Updated: April 19, 2017 03:09 IST