मुंबई : उपनगरीय प्रवाशांना प्रतीक्षेत असणारी एसी (वातानुकूलित) लोकल येत्या मंगळवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल दाखल झाल्यानंतर ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर तिच्या चाचण्या १६ एप्रिलपासून सुरू केल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली. पश्चिम रेल्वेवर एसी लोकल दाखल होईल, अशी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू असतानाच रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बनत असलेली एसी लोकल आता मुंबईसाठी रवाना झाली आहे. मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत एसी लोकल मुंबईत दाखल होईल, अशी माहिती सूद यांनी दिली. ही लोकल दाखल होताच कुर्ला कारशेडमध्ये तिला थांबा देण्याचा विचार आहे. भारतीय रेल्वेची सुरुवात १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमधूनच झाली. हा ऐतिहासिक दिवस लक्षात घेता १६ एप्रिलपासूनच एसी लोकलची चाचणी सुरू होईल, असे सूद म्हणाले. याचे भाडे दिल्ली मेट्रोप्रमाणेच ठरविण्याचा विचार आहे.
एसी लोकल निघाली; मंगळवारी होणार मुंबईत प्रवेश!
By admin | Updated: April 4, 2016 02:20 IST