सुधीर राणे/ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 14 - नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग होता. पूर्वीचे नाटकाचे वातावरण आता राहिलेले नाही. मात्र, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रायोगिक नाट्योत्सवामुळे ते वातावरण पुन्हा निर्माण होवून मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव मिळेल. कारण ते वातावरण आजही कणकवलीत आहे. असे मत रंगकर्मी अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक नाटयोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विख्यात हिंदी नाट्य- चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शहा , राज्यस्थानचे कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुनदेव चारण , आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित आदी उपस्थित होते.यावेळी अमोल पालेकर म्हणाले, सन 1970-80 या दशकातील नाट्याचे वातावरण भारावून टाकणारे होते. ते वातावरण सध्या नक्कीच नाही. पण कणकवलीत आल्यावर ते वातावरण पुन्हा कोठेतरी पुनर्जीवित होईल असे वाटत रहाते. या मागे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानची प्रायोगिक नाटकाची चळवळ आहे. नाटक हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. तो तसाच राहण्यासाठी प्रतिष्ठान सारख्या चळवळीचीच आज गरज आहे. असेही ते म्हणाले.नसिरुद्दीन शहा म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठान सारखी संस्था गेली 25 वर्षे प्रायोगिक नाट्य चळवळ चालवते या मागे मोठे परिश्रम आहेत. माझे कणकवलीशी खूप जुने नाते आहे. नाट्य चळवळीचा अंत होत आहे असे, अनेक वेळा अनेक ठिकाणी म्हटले जाते. मात्र, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान जोपर्यन्त कार्यरत आहे.तोपर्यन्त नाट्य चवळीचा अंत होणे शक्य नाही. डॉ. अर्जुनदेव चारण म्हणाले, आजच्या असंवेदनशील काळात मनोरंजन करणे दिवसेंदिवस फार कठीण होत आहे. अशा काळातच प्रतिष्ठान सारख्या नाट्य चळवळीची गरज आहे. समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे काम अशा गुणात्मक चळवळीतून होत असते. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याचीही तितकीच गरज आहे.(प्रतिनिधी)
आचरेकर प्रतिष्ठानमुळे प्रायोगिक नाट्य चळवळीला गतवैभव - अमोल पालेकर
By admin | Updated: February 14, 2017 19:49 IST