चौके (सिंधुदुर्ग) : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रोत्सवास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन नवस फेडले. त्यामुळे संपूर्ण आंगणेवाडी परिसर भराडीदेवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.भराडीदेवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनरांगा लागल्या होत्या. देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी यावर्षी नऊ ठिकाणांहून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. गतवर्षी दर्शनाच्या सहा रांगा होत्या. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार विजय सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. (वार्ताहर)