बोगस बियाण्यांचा धोका : शेतकरी दुहेरी संकटात जीवन रामावत-नागपूर सध्या विदर्भातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अगोदरच सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्यांपुढे आता बोगस बियाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मान्सूनची चाहूल लागताच बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण सोयाबीनच्या बोगस बियाण्याने सर्वांची चिंता वाढविली आहे. बीज परीक्षण प्रयोगशाळेच्या एका अहवालानुसार यंदा सोयाबीन बियाण्याच्या २९६ नमुन्यांपैकी केवळ १५ (५ टक्के) नमुने पात्र ठरले असून, इतर २८१ (९५ टक्के) नमुने फेल ठरले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात कृषी विभागाचे बियाणे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकांकडून आलेल्या ८३ नमुन्यांसह शेतकर्यांकडील १९९ व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या १४ नमुन्यांचा समावेश आहे. बीज परीक्षण प्रयोगशाळेत या सर्व नमुन्यांचे परीक्षण केले असता, त्यापैकी कृषी विभागाकडून आलेल्या ८३ पैकी ७४ नमुने बाद ठरले आहे तसेच शेतकर्यांचे १९९ पैकी १९३ व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे १४ पैकी १४ नमुने अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी कधीही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सोयाबीन बियाण्यांचे नमुने अपात्र ठरलेले नाहीत. यामुळे यंदा स्वत: प्रयोगशाळेने बाजारात मोठय़ा प्रमाणात बोगस बियाणने दाखल होण्याची भीती व्यक्त करून, शेतकर्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गतवर्षी विदर्भात झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. यात अनेकांच्या सोयाबीनला अंकुर फुटले होते. शिवाय काहींचे सोयाबीन काळे पडले होते. यानंतर व्यापार्यांनी ते सर्व सोयाबीन कमी किमतीत खरेदी करून, आता तेच पुन्हा बियाण्याच्या स्वरूपात शेतकर्यांच्या माथी मारल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराज बाग चौकातील बीज परीक्षण प्रयोगशाळा ही बियाण्यांचे नमुने तपासणारी विदर्भातील एकमेव प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेच्या अहवालाने सर्वांची चिंता वाढविली आहे.
सोयाबीनचे ९५ टक्के बियाणे फेल!
By admin | Updated: June 5, 2014 00:58 IST