पुणे/जळगाव/बुलढाणा : राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला. विदर्भ, खान्देशातील होरपळ कायम असून, सर्वाधिक तापमान उपराजधानी नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील २४ तास राज्याचे तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने चढाच आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अतिउष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक होरपळ विदर्भ, खान्देशवासीयांची होत आहे. या लाटेत बुधवारी आठ तर सगल दुसऱ्या दिवशी गुरुवारी १४ जणांचा बळी गेला. पाठोपाठ शुक्रवारी नऊ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये सहा जण खान्देशातील तर तीन जण विदर्भातील आहेत. धुळे जिल्ह्यातील विकास माळी, मिलिंद चित्ते आणि जळगाव जिल्ह्यातील मनोज भादलीकर, सुनील शालिग्राम, वाणी येथील रवीकांत चौधरी आणि रघुनाथ बाविस्कर अशी खान्देशातील मृतांची नावे आहेत. अकोल्यात शिवहरी धाडसे (७०) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. बुलडाण्यातील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (६५) आणि मोताळा येथील सुभाष दोडे (६३) यांचाही उष्माघाताने बळी गेला.
उष्णतेच्या लाटेचे आणखी ९ बळी
By admin | Updated: May 21, 2016 06:11 IST