मच्छिंद्र देशमुख -कोतूळ (अहमदनगर)शांतता, प्रेम, अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन (श्वेतांबर) पंथाचे अस्तित्व १३व्या शतकात होते, हे कोतूळच्या जैन मंदिरातील ८०० वर्षांपूर्वीच्या शामला पार्श्वनाथाच्या मूर्तीने अधोरेखित झाले आहे.अकोले तालुक्यातील कोतूळ गावात देसाई, शहा अशा आडनावांची ३०० वर्षांपूर्वी ३५ कुटुंबे वास्तव्यास असल्याचे जुन्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. या कुटुंबांनी त्या काळात जैन (श्वेतांबर) मंदिराची स्थापना केली. मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला पण मूर्ती तशाच राहिल्या. या मूर्ती पांढऱ्या व काळ्या रंगाच्या संगमरवरी, सुवर्णमंडित आहेत. मूर्तीच्या तळावर दोन भागांत वर्ष कोरलेले आहे. त्यानुसार शामला पार्श्वनाथ १३वे शतक व अभिनंदन स्वामी १६व्या शतकातील म्हणजेच या मूर्ती ८०० वर्षांपूर्वीच्या असल्याचा पुरावा मिळतो. मंदिरात अभिनंदन स्वामी, मुनीसुरतजी, महावीर स्वामी, चिंतामणी पार्श्वनाथ, शंखेश्वर, चंद्रप्रभू अशा ३०० वर्षांपूर्वीच्या मूर्तीदेखील आहेत. मनीभंद्राची ३०० वर्षांपूर्वी नारळावर स्थापन केलेली मूर्ती प्रतीमाह शेंदूर लेप दिल्याने ५ फूट उंचीवर गेली आहे. कोतूळ व राजूर गावात जैन समाजाची अनेक घरे होती. परंतु ९० वर्षांपूर्वी झालेल्या एका बंडात लुटीच्या भीतीने ही कुटुंबे शहराकडे गेली. आज गावात जैन समाजाची केवळ ४ कुटुंबे आहेत. महाराष्ट्र जैन पंचांचे सदस्य चंदूलाल स्वरूपचंद शहा (पुणे) हे कोतूळ गावचे आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ५० राजस्थानी शिल्पकारांच्या मदतीने पाच महिन्यांपासून अहोरात्र सुरू असलेले मंदिराचे कोरीव काम अंतिम टप्प्यात आहे.मंदिरासाठी आॅस्ट्रेलिया येथील जैन बांधवांनी भरीव मदत केली आहे. नाजूक नक्षीकामासाठी फायबर मोल्डचा वापर केला जात आहे. - सुनील शहा, विश्वस्त जैन पंच
कोतूळला ८०० वर्षांची पार्श्वनाथ मूर्ती
By admin | Updated: February 8, 2015 01:36 IST