उल्हासनगर : पाच बँकांच्या विविध एटीएममध्ये पासवर्डचा गैरवापर करीत ८० लाखांचा अपहार करणाऱ्या त्रिकुटाविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असून आकाश डांगे व योगेश डांगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे. न्यायालयाने दोघांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. उल्हासनगरातील विविध बँकांनी त्यांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचा ठेका पवईतील ईपीएस कंपनीला दिला आहे. तिला सिसको प्रोसिजर होल्ंिडग लिमिटेड नावाची कंपनी मदत करते. सिसको विविध बँकामधून रोख रक्कम उचलून त्यांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करते. त्यासाठी त्यांनी आकाश डांगे व विनायक सातपुते यांची नियुक्ती केली आहे. हा व्यवहार बँकेच्या संमतीने नियमित कागदपत्रांसह केला जातो. पण पासवर्ड टाकून एटीएममध्ये पैसे भरायचे आणि त्याचा मेसेज संबंधित बँकेला गेल्यावर लगेचच ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग ही टोळी करीत असे. एटीएम मशीनमध्ये पैशांचा भरणा करण्यासाठी नेमलेल्या व्यक्तीकडे सुरक्षित पासवर्ड दिला आहे. सातपुते व डांगे यांच्याकडे नऊ एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम दिले आहे. कॅम्प नं-चार येथे आशेळे गावाजवळील एसबीआय व होली फॅमिली शाळेजवळील एसबीआय बॅकेच्या एटीएममधून आकाश डांगे, विनायक सातपुते, पूर्वीचा कर्मचारी व आकाश डांगे यांचा चुलत भाऊ योगेश डांगे यांनी संगनमत केले आणि कंपनीच्या पासवर्डचा गैरवापर करून २० लाख ६१ हजार २०० रूपयांचा अपहार केला. या प्रकरणी सिसको कंपनीचे व्यवस्थापक जावेद शेख यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आकाश व विनायक यांनी शहाडच्या युको बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी घेतलेल्या रकमेचा भरणा न करता पासवर्डचा गैरवापर करत ३२ लाख ५० हजार १०० रूपयांचा अपहार केला आहे. (प्रतिनिधी)
पाच बँकांच्या एटीएममधून ८० लाखांची हेराफेरी
By admin | Updated: April 30, 2016 02:58 IST