पुणे : माळीण (ता. आंबेगाव) येथील खचलेल्या डोंगराचा राडारोडा अहोरात्र उपसणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या (एनडीआरएफ) जवानांनी आणखी ३१ मृतदेह बाहेर काढल्याने शुक्रवार दुपारपर्यंत हाती लागलेल्या मृतदेहांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगराचा कडा कोसळून जवळपास संपूर्ण गाव गाडले गेले. सुरुवातीस या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काहींना वाचवण्यात एनडीआरएफ व इतर स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांना यश आले. सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. जवानांना जेसीबी यंत्राचा वापर हळुवारपणे करावा लागत आहे. दरड कोसळून हा भाग उंचसखल झाल्याने पहिल्या दिवशी मृतदेह बाहेर काढण्याचे प्रमाण कमी होते. सापडलेल्या मृतदेहांची अवस्था पाहता तातडीने सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पाऊस थांबल्यानंतर दुपारी १ च्या सुमारास २५ मृतदेहांना अग्नी देण्यात आला. आतापर्यंत ५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अजूनही या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. हा ढिगारा उपसण्यास आणखी दोन दिवस लागतील, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास ५-६ दिवस लागू शकतील. (प्रतिनिधी)
७१ मृतदेह हाती!
By admin | Updated: August 2, 2014 03:09 IST