मुंबई : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायांच्या पंढरपूरचा ६४७ कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर केला असून, या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी कृती कार्यक्रम येत्या एक महिन्याच्या आत जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. पंढरपूरमध्ये हाती घेण्यात आलेली विकासाच्या ३० कामांपैकी ११ पूर्ण झाली असून, उर्वरित १९ पैकी १० कामे येत्या जूनपूर्वी तर राहिलेली कामे वर्षाअखेर पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भारत भालके, दिलीप सोपल आदी सदस्यांनी पंढरपूरच्या विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. तर ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, सुभाष देशमुख, राम कदम, हणमंत डोळस, दत्तात्रय भरणे यांनी चर्चेत भाग घेतला. पंढरपूरच्या देवाला या देवाजीकडून (देवेंद्र) अपेक्षा आहे, अशी मिश्कील टिपण्णी सोपल यांनी केली. चंद्रभागा नदीच्या पात्रात मंडप टाकण्यास उच्च न्यायालयाने मनाई केल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आपण सोलापूरचे पालकमंत्री आणि पुणे विभागीय आयुक्तांना वारकऱ्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यास सांगितले असून तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंढरपूरच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र आयएएस अधिकारी नेमण्याची आवश्यकता तपासून पाहिली जाईल. तसेच सुरक्षेच्या नावाखाली चारचाकी वाहनांना मुख्य मंदिराजवळील मार्गावरून जाऊ दिले जात नाही. वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्याच्या सूचना दिल्या जातील, असे ते म्हणाले.
पंढरपूरसाठी ६४७ कोटींचा विकास आरखडा
By admin | Updated: March 28, 2015 01:45 IST