पुणे : नवीन बांधकाम साईटवर फ्लॅटचे बुकिंग घेऊन ६४ ग्राहकांची तब्बल २८ कोटी रुपयांची फसवणूक करून बिल्डर पसार झाला आहे. याप्रकरणी तिरुपती हाऊसिंग डेव्हलपर्स प्रा. लि. या बांधकाम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१४ पासून शनिवारपर्यंत घडला आहे. दिलीप दिनेश पटेल, करमसी वालाजी पटेल, जवाहर पटेल, मनोज मेघाजी दिवाणी, कीर्तीकुमार दिनेश पटेल, कल्पेश करमशी पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव जीवन गुप्ता (वय ३२, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. तिरुपती हाऊसिंग डेव्हलपर्सच्या बांधकाम स्कीमबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष महंमदवाडी येथील मेपल टॉवर्स या साईटवर जाऊन पाहणी केली होती. या साईटवर एजंट सनी बाखळे त्यांना भेटले होते. त्यांनी दाखवलेला सॅम्पल फ्लॅट गुप्ता यांना आवडला होता. घरच्यांशी विचारविनिमय करून त्यांनी फ्लॅट बुक केला होता. यासंदर्भात मनोज दिवाण आणि बाखळे यांच्याशी त्यांची प्रत्यक्ष साईटवरील कार्यालयात चर्चा झाली होती.त्या वेळी सोलर वॉटर हिटर बसवून त्यानंतर इमारत पूर्ण करून पुणे मनपाचे कंप्लिशन सर्टिफिकेट व भोगवटापत्र घेऊन ३० जून २०१५ पर्यंत ताबा देणार असल्याचे आरोपींनी गुप्ता यांना सांगितले होते. यासोबतच या साईटसाठी एका बँकेचे कर्ज घेतलेले असून हे कर्ज फेडल्यावरच ताबा देणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून गुप्ता यांनी सर्व खर्चासह एकूण ५४ लाख २३ हजार ७९५ रुपयांमध्ये फ्लॅट बुक केला. त्यांनी वेळोवेळी विविध खात्यांवर पैसे भरले. दरम्यान, दिवाणी याच्यासोबत जाऊन त्यांनी खरेदीखत करून घेतले. यासोबतच होम लोन मंजूर करून घेतले. दिलीप पटेल यांच्यासोबत वारंवार डिसेंबर २०१५ पर्यंत ग्राहकांनी बैठका घेतल्या. त्या वेळी आम्ही लवकरच बांधकाम पुन्हा सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मात्र पटेल यांनी ग्राहकांचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डिसेंबर २०१५ मध्ये ६४ ग्राहक एकत्र आले. त्यांनी ४ मार्च २०१६ रोजी मेपल टॉवर को. आॅपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. त्याचे गुप्ता चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. हे सर्व जण पुन्हा साईटवर गेले असता तेथील कार्यालय बंद करण्यात आले होते. हे कार्यालय भलत्याच व्यक्तीला देण्यात आल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांनी वकिलामार्फत पटेल यांना पाठवलेली नोटीस आरोपींनी स्वीकारली. परंतु, त्याचे उत्तर अद्याप दिले नाही. आपली फसवणूक झाल्याप्रकरणी या सर्वांनी पोलिसांकडे धाव घेतली.
६४ ग्राहकांना २८ कोटींचा गंडा
By admin | Updated: July 4, 2016 01:13 IST