मुंबई : अबकारी विभागाने ड्राय डेच्या दिवशी गुजरातमधून मुंबईला आणण्यात येत असलेली सुमारे ६ लाखांची दारू जप्त केली आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये दारुबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणण्यात येत असलेला अवैध दारुसाठा अबकारी विभागाने जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. ६ लाखांच्या दारूच्या साठ्यासह एक कार देखील अबकारी खात्याने ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेली दारू काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका आणि सणांसाठी आणण्यात येत होती, अशी माहिती अबकारी खात्यातील सूत्रांनी दिली. गुजरातमधून अवैध दारू मुंबईत आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती मालवणी अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दहिसर चेकनाक्यावर सापळा रचून हा दारूचा साठा जप्त केला. पकडण्यात आलेल्या दारूमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांच्या ब्रँडचा समावेश आहे. हा सर्व साठा ताब्यात घेण्यात आला असून, अधिक तपास संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
६ लाखांचा अवैध दारुसाठा जप्त
By admin | Updated: October 7, 2014 08:51 IST