जयंत धुळप
अलिबाग, दि. ३० - अनेकांची नोकरीच्या अखेरच्या दिवशी समारंभपूर्वक निवृत्ती होते. पण रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलिस उप निरिक्षक विश्वनाथ पाटील यांनी ५८ कि.मी. अंतर धावून वेगळया पद्धतीने निवृत्ती स्वीकारली.
मूळचे क्रिडापटू असणारे विश्वनाथ पाटील अलिबाग पोलीस मुख्यालय-कालेर्खिंड-पोयनाड-वडखळ-साई मंदिर(पेण) आणि परत अलिबाग पोलीस मुख्यालय असे ५८ किमी अंतर धावणार आहेत. ते ५८ वर्षांचे असून, त्यांनी आज पहाटे पाच वाजता येथील पोलीस मुख्यालयातून धावण्यास प्रारंभ केला.
आपली ही 58 किमीची दौड सहा तासात पूर्ण करुन ११ वाजेपर्यंत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर परत येवून पोहोचणार असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विश्वनाथ पाटील ३९ वर्षाच्या पोलीस सेवेतून आज निवृत्त होत आहेत. पोलिस उप अधिक्षक(गृह) राजेंद्र दंडाळे यांनी पहाटे त्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी धावण्यास प्रारंभ केला.