ठाणे : भिवंडी महापालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येसाठी ५० लाखांची सुपारी दिली होती. मारेकऱ्यांना ठरल्याप्रमाणे काही रक्कम हत्येपूर्वी आणि नंतरही दिल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. म्हात्रे यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हात्रे यांच्या मुलीला मुलगा पाहण्यास येणार होता, असे पोलिसांनी सांगितले.ठाणे महापालिका निवडणुकीची रणधूमाळी सुरू असताना, भिवंडीत १४ फेब्रुवारीला म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या राजकीय वारसाहक्क मिळवण्यातून झाली असून, त्यासाठी ५० लाखांची सुपारी दिली होती. सुपारी देणारे आणि मारेकरी हे म्हात्रे यांचे नातेवाईक आहेत. या घटनेतील फरार असणारा आरोपी प्रशांत म्हात्रे आणि मनोज म्हात्रे यांच्यात बऱ्याच वर्षांपासून वाद-विवाद सुरु होता. तरीसुद्धा दोन कुटुंबांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरु होते. प्रशांतसह मारेकरी हे पूर्वी मनोज म्हात्रे यांच्याकडे काम करीत असत. मात्र, प्रशांत हा गरम डोक्याचा असल्याने त्याने आपला वेगळा व्यवसाय सुरू केला. मारेकरी प्रशांतसाठी काम करू लागले. म्हात्रे यांचा अंगरक्षक जिग्नेश पटेल प्रशांतच्याही ओळखीचा असल्याने तो त्याला जाऊन भेटल्याचे तपास समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येचा कट शिजत असताना, अंगरक्षक जिग्नेश हा प्रशांतसोबत होता. तसेच त्याने त्याच्यासोबत वाईन घेत जेवण केले. हत्येपूर्वी त्याने म्हात्रे यांची इत्यंभूत माहिती दिली असून, प्रशांतने ज्या ठिकाणी बैठक घेतली तेथे एक राऊंड फायर केल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी राजकीय दबाव वाढल्यावर हा तपास गुन्हे शाखेच्या ठाणे खंडणी पथकाकडे वर्ग केला. याचदरम्यान खंडणी पथकप्रमुख एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने अंगरक्षकासह पाच जणांना अटक केली असून, आतापर्यंत एकूण सात जणांना अटक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी) >६ महिन्यापूर्वीच व्यवसाय भाड्याने दिला म्हात्रे यांच्या हत्येच्या ६ महिन्यांपूर्वीच प्रशांतने आपला व्यवसाय भाड्याने चालविण्यासाठी दिला होता. तर हत्येच्या १५ दिवसांपूर्वी प्रशांत म्हात्रे यांच्या घरी येऊन गेला होता. त्यावेळी त्याने म्हात्रे यांच्या पत्नीला (काकी) आमचे वाद आता संपल्याचे सांगितले होते.एअर बंदूक घेतली होती : प्रशांत हा नेमबाजीच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नेमबाजी प्रशिक्षणाचा क्लास लावणार होता. त्याने आॅनलाईन २ लाखांची एअर बंदूक विकत घेतली होती.
हत्येसाठी दिली होती ५० लाखांची सुपारी!
By admin | Updated: March 6, 2017 05:16 IST