दापोली : आंजर्ले खाडीतील ओहोटीच्या पाण्याने आत खेचल्यामुळे पुण्याचे नऊ पर्यटक बुडाले. यापैकी तिघांना स्थानिकांनी वाचविले, तर पती-पत्नीसह पाचजणांचा बुडून मृत्यू झाला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली. पुणे येथील डांगी व ओझा या कुटुंबातील २० जण दापोलीनजीकच्या आंजर्ले समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. रविवारी दुपारी १ वाजता आंजर्ले खाडीतील पाण्यात स्नान करण्यासाठी आठजण उतरले; परंतु ओहोटी सुरू झाल्याने सर्वजण पाण्यात आत ओढले जाऊ लागले. बुडणार्यांपैकी काहीजणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, जवळपास कोणीही नसल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही. काही वेळानंतर ही बाब किनारी असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी समुद्रात धाव घेतली. खाडीच्या मुखाशी खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटक समुद्राच्या ओहोटीच्या पाण्याबरोबर आत ओढले गेल्याने पाचजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगीता संतोष ओझा (३५, अरण्येश्वर, पुणे), पवन पुरुषोत्तम डांगी (९), ऋती शांतिलाल डांगी (१३), शाम बाबूलाल डांगी (४०) सविता शाम डांगी (३८, सर्व दत्तवाडी, पुणे) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अर्पण शर्मा (पर्वतीनगर, पुणे) हा अजूनही बेपत्ताच आहे. त्याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. (प्रतिनिधी)
आंजर्ले समुदात ५ जण बुडाले
By admin | Updated: May 26, 2014 02:37 IST