पुणे : खासगी वाहतूकदारांशी साटेलोटे करणे, तिकीटावर हात मारण्याचे प्रकार बंद करण्याचे आवाहन करतानाच चालक किंवा वाहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. महाराष्ट्र एस.टी.कामगार शिवसेनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी एस.टी.कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, आमदार प्रताप चिखलीकर, माजी आमदार विजयराज शिंदे,सेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर, सरचिटणीस सुनील गणाचार्य आदी व्यासपीठावर होते. रावते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचाही आरोग्य कवच योजनेत समावेश करण्यात येईल़ कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनेची रक्कम दीड लाखांवरून तीन लाख केली जाईल, असे त्यांनी सांगितले़ कमी वेतन असल्याने अनेकांनी काम सोडून जाणे, अनेकांनी जीवावर बेतेल असा ओव्हरटाईम करणे, काही अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या कामगारांनाच ओव्हरटाईम देऊन संधी देणे या बाबींचा उहापोह करून रावते यांनी हे प्रकार यापुढे बंद होणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
चालक, वाहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाखांची मदत
By admin | Updated: February 16, 2015 03:15 IST