जळगाव : मुक्ताई सहकारी सूतगिरणी आणि पॉलीहाउसच्या अनुदानासंदर्भात केलेल्या आरोपांप्रकरणी, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी शिवसेनेचे उपनेते तथा आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा न्यायालयात ५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. खडसे यांनी मुक्ताईनगर येथील सूतगिरणीसाठी १६१ कोटी रुपयांचे अनुदान लाटले, तसेच त्यांच्या शेतात पॉलीहाउससाठीच्या प्रस्तावासह अनुदान एका दिवसात मंजूर केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्याशिवाय पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात, खडसेंनी ‘सेटींग’ केली आणि जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला होता. यात आपली बदनामी झाल्याचे सांगत, खडसेंनी मानहानीचा दावा दाखल केला आहे.दावा दाखल केल्यानंतर खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘गुलाबराव पाटील यांनी बेछूट आरोप केले आहेत. सूतगिरणीसाठी १६१ कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचे ते म्हणतात. मुळात हा प्रकल्प ५८ कोटी रुपयांचाच आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांचे अनुदान मी घेतले आहे. पॉलीहाउससाठी नऊ महिन्यांपूर्वी अर्ज केला होता, तेव्हा मी कृषिमंत्री नव्हतो. नियमानुसार, सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक शेतकरी या नात्याने नऊ महिन्यांनी मला अनुदान मंजूर झाले.’गुलाबरावांच्या आरोपामुळे माझी मानहानी झाली. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध ५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला.- एकनाथराव खडसे, महसूलमंत्री
आमदाराविरुद्ध खडसेंचा पाच कोटींचा दावा
By admin | Updated: December 31, 2015 00:57 IST