मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात आलेला गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूल शनिवारी (३० एप्रिल) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर गोरेगाव पश्चिम ते गोरेगाव पूर्वेकडील प्रवासासाठी केवळ सहा मिनिटांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी हेच अंतर कापण्यासाठी तब्बल ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता.गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) योजनेंतर्गत २००४ साली प्रस्तावित करण्यात आला. हा प्रकल्प २००८ मध्ये मुंबई महापालिकेकडे हस्तांरित करण्यात आला. प्रकल्पग्रस्त, अतिक्रमणे, झोपडपट्टी व रेल्वे खात्याची परवानगी या सर्व बाबींवर प्रशासकीय व तांत्रिक अडचणी जलद पाठपुराव्यानिशी दूर करून या पुलाच्या बांधकामासाठी परवानगी घेण्यात आली. निवासी २१८, व्यावसायिक १४० अशी एकूण ३५८ अतिक्रमणे या प्रकल्पाच्या मार्गामधील प्रमुख अडचणी होत्या. ही अतिक्रमणे हटवून/ पुनर्स्थापन करून हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला. (प्रतिनिधी)>गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे स्वामी विवेकानंद मार्ग ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या दरम्यान पूर्व-पश्चिम अशी अतिरिक्त मार्गाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. ओशिवरा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त रस्तादेखील या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. गोरेगाव पश्चिम ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत विनाअडथळा वाहतूक शक्य होणार आहे.>२००९ साली महापालिकेतर्फे या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. अतिरिक्त मार्गिका आणि चढ/उतारांसह सुमारे २.३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता पूर्ण झाला आहे. पुलाच्या रुंदीमध्ये ४ पदरी मार्गिका, उत्तर दिशेला जाणाऱ्या वाहतुकीकरिता ४ मीटर रुंदीची पूर्व भागातील मार्गिका तसेच भविष्यातील स्वामी विवेकानंद मार्गाच्या पश्चिमेस होणाऱ्या विस्तारासाठी ७.५ मीटर रुंदीच्या दोन मार्गिकांचा समावेश आहे.>सामाजिक, राजकीय चळवळीतील नेत्या, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद, खासदारपद भूषविलेल्या आणि जनमानसात लोकप्रिय असलेल्या मृणालताई गोरे यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची स्मृती चिरंतर राहावी म्हणून या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
४५ मिनिटांचा प्रवास आता ६ मिनिटांत
By admin | Updated: April 30, 2016 02:07 IST