मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांची ४०० पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागात डॉक्टरांच्या व विशेषज्ञांच्या भरतीवर कोणतेही बंधन नाही. त्यांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या विनापरवानगी गैरहजरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या ९७१ आजारांपैकी बहुतांशी आजारांच्या सेवा घेण्याचे प्रमाण शून्य आहे. म्हणून योजनेत सुधारणा करून इतर आजारांचा समावेश करवा. तसेच, या योजनेतील निधीमध्ये वाढ करणेही आवश्यक आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सेवा सर्वाधिक घेतल्या जात असल्याने त्याचे दर वाढविण्याबाबत विचार करावा, या योजनेंतर्गत नव्याने सहभागी होणाऱ्या रुग्णालयासाठी अटी शिथिल करून रुग्णालयांची संख्या वाढविण्यावर भर देऊन सामान्य नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.खासगी व सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवांचे बळकटीकरण करावे, तसेच याबाबतचा पहिला पथदर्शी प्रकल्प अमरावतीमध्ये राबविण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
४०० डॉक्टरांची तातडीने भरती
By admin | Updated: October 14, 2015 03:51 IST