मुंबई : माजी आमदारांचे पेन्शन २५ हजार रुपयांवरून ४० हजार रुपये करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली़ त्यामुळे आता माजी आमदारांना ४० हजारांचे पेन्शन मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे़सूर्यकांत देशमुख यांनी ही याचिका केली होती़ निवडून आलेल्या आमदाराची मालमत्ता पाच वर्षांत किती होते? हे त्यांनी पुढच्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते़ बहुतांश आमदारांचे साखर कारखाने व शिक्षण संस्था आहेत़ तसेच दुष्काळ, बेरोजगार यांसह अनेक महत्त्वाचे विषय राज्याला भेडसावत असताना दोन वर्षांपूर्वी शासनाने विधिमंडळात आमदारांच्या पेन्शनवाढीचा प्रस्ताव आणला व काही वेळातच तो बिनविरोध मंजूर झाला़ मात्र अनेक ज्येष्ठ कलावंत, पत्रकार हे पेन्शनच्या प्रतीक्षेत असताना आमदारांच्या पेन्शनवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे गैर आहे़ त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)कायद्याच्या चौकटीत राहूनच आमदारांचे पेन्शन वाढवण्यात आले आहे़ तसेच हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असून, यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने ही याचिका फेटाळली़
माजी आमदारांना ४० हजार पेन्शन
By admin | Updated: February 3, 2015 01:47 IST