मुंबई : सांताक्रुझमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला; तीन जण जखमी झाले. जखमींवर व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांताक्रुझच्या गोळीबार परिसरात असलेल्या मणिलाल चाळीच्या खोली क्रमांक ४मध्ये राहणारी सईलकुमारी दीक्षित (४०) ही महिला सकाळी सिलिंडर बदलत होती. त्या वेळी सिलिंडर नीट न लागल्याने त्यातून गॅसगळती होऊन अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यात यशवंत दीक्षित (१८), राजेंद्र दीक्षित (३०), कपिल दीक्षित (४०), राजदेव दीक्षित (५०) यांचा मृत्यू झाला. सईलकुमारी, मीरा उपाध्याय (४०) आणि शोभा राजेंद्र दीक्षित या जखमी झाल्या. पत्रकारांना मारहाणसांताक्रुझ आगीचे वार्तांकन करण्याऱ्या वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्राच्या काही महिला पत्रकार तसेच फोटोग्राफरना स्थानिक गुंडांकडून मारहाण करण्यात आली; तर महिला पत्रकारांना पाहून अश्लील शेरेबाजी आणि धक्काबुक्की करणे, असे प्रकारही येथे घडले. याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग निर्मलनगर पोलिसांना दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलमान शेख या तरूणाला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
सिलिंडर स्फोटात सांताक्रुझला ४ ठार
By admin | Updated: July 17, 2015 05:08 IST