भार्इंदर : पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरातील ८० हजारांहून अधिक मतदार मतदानाला मुकले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. सुमारे ३५ हजार मतदार मतदानाला मुकले. मिरा-भाईंदरमध्ये याद्यांचा घोळ प्रत्येक निवडणुकीत कायम राहत असल्याचे पाहावयास दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ८० हजारांहून अधिक मतदारांना यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी याद्यांतून वगळलेल्या मतदारांचे पुन्हा मतदान घेण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे धरला होता. मतदारांची नव्याने नोंदणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आश्वासनानंतर त्या मतदारांना पुन्हा मतदार नोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जाचे सोपस्कार पार पडल्यानंतरही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या नावांचा फंडा तसाच राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या काहींची नावे विधानसभेच्या मतदार यादीतून वगळल्याने त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून मतदान न करताच माघारी फिरावे लागले.
हक्काला मुकले ३५ हजार मतदार
By admin | Updated: October 16, 2014 05:09 IST