शहापूर : वीजदरात सवलत दिल्यामुळे महावितरणला सोसावा लागलेला घाटा सावरण्यासाठी राज्य सरकारने ३०६ कोटी रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहक यांना वीजदरात सवलत दिल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती, फळपिकांच्या नुकसानीसाठी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना वीजदेयके माफ केल्याने हा तोटा झाला होता. ५ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.२०१३मध्ये झालेली वीज दरवाढ कमी करून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंप ग्राहकांचे ० ते ३०० युनिटपर्यंतचे दर समकक्ष पातळीवर आणण्यात आले होते. २०१४मध्ये फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोकणासह विदर्भ, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर या भागांतील शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला होता. शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी शासनाने घेतला होता. महावितरण कंपनीचा घाटा लक्षात घेऊन सवलतीपोटी ७०६ कोटी व अधिक तरतूद १०० कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता देण्यात आली होती. २०१४-१५च्या अर्थसंकल्पातही १०,५०० कोटी मूळ तरतूद, ९ हजार कोटींची अधिक पुरवणी मागणी १५०० कोटी रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार, ७२३७ कोटी ११ लाख रु पये रकमेचे वाटप महावितरण कंपनीला केले आहे. उर्वरित ३०६ कोटींची रक्कम प्रस्तावित होती. त्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसाहाय्यातून वीज वितरण कंपनीचा घाटा सावरला आहे. (प्रतिनिधी)
महावितरणला ३०६ कोटींची मदत
By admin | Updated: November 10, 2014 04:21 IST