पनवेल : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. सकाळी ८ वाजल्यापासून श्रीसदस्यांनी वेगवेगळे गट तयार करून संपूर्ण पनवेल शहरातील रस्ते आणि महत्त्वाची ठिकाणे चकाचक केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, पनवेल आयटीआय परिसरातील २७ टन कचरा श्रीसदस्यांनी जमा केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ‘पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शासनाने मुबलक जागा दिली असली, तरी त्याच्या निगराणीसाठी पुरेसा निधी दिलेला नव्हता. सुदैवाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सचिन धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे या परिसराचा नवा चेहरा येथील प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी पाहत आहेत. पनवेल शहराचा विस्तार पाहता आपला परिसर स्वच्छ ठेवावा ही जाणीव यानिमित्ताने नागरिकांमध्ये निर्माण करण्याचे काम झालेले आहे. स्वच्छतेतून आरोग्य आणि सुशोभीकरणाकडे आपण वाटचाल करीत आहोत, याचा साक्षात्कार पनवेलकरांना पाहायला मिळाला आहे.’ श्रीसदस्यांचे आभारही त्यांनी या वेळी मानले. वर्षभरातील काही तास स्वच्छतेसाठी द्यावे, असे आवाहनही त्यांनी आयटीआयच्या प्राचार्यांना केले. पनवेल तालुका पोलीस स्टेशन, एसटी आगार, कोळीवाडा, रोज बाजार, टपाल नाका, नवीन पनवेल सेक्टर ७, खांदा वसाहतीच्या या महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाटही या मोहिमेमध्ये लावण्यात आली. या मोहिमेत माजी नगरसेवक संतोष शेट्टी, भाजपा ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, अनंता तोडेकर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, राजेंद्र मांजरेकर, संतोष शर्मा, अजय माळी यांनीही सहभाग घेतला होता. याप्रमाणेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)>पनवेल परिसरातील रस्ते चकाचकस्वच्छतेतून आरोग्य आणि सुशोभीकरणाकडे आपण वाटचाल करीत आहोत, याचा साक्षात्कार पनवेलकरांना पाहायला मिळाला आहे. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे व कळंबोली येथील एकूण ९६.६ कि.मी.चे रस्ते व शासकीय कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ६,१४० श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. त्यांनी २३७.६ टन सुका कचरा जमा केला. यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व अनेक माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
पनवेल आयटीआय परिसरात २७ टन कचरा केला जमा
By admin | Updated: March 2, 2017 02:56 IST