भक्ती सोमण, मुंबई मुंबईच्या महालक्ष्मी समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले भुलाबाई देसाई रोडवरचे महालक्ष्मी मंदिर. मुंबईतल्या प्रमुख मंदिरांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या या मंदिराला २५० वर्षांचा इतिहास आहे.देवी नवसाला पावत असल्याची भावना असल्याने नेहमीच देवळात गर्दी दिसून येते. या दिवसांत विशेषत: पंचमीनंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पार हमरस्त्यापर्यंत लागते. १७५१ साली ब्रिटिशांनी नवे मार्ग बनवण्यास सुरुवात केली. तेव्हा महालक्ष्मीपासून वरळीपर्यंत जाणे सोपे व्हावे यासाठी हा मार्ग जोडावा असे ठरले. त्यातून ब्रीच कँडी या परिसरातून मार्ग बनवण्याची योजना आखण्यात आली. काम सुरू असताना समुद्रातल्या वादळांचाही सामना करावा लागत होता. या संकटामुळे ही योजना बारगळणार असेच वाटत होते. त्याचदरमान या भागात राहणाऱ्या रामजी शिवजी यांना लक्ष्मी देवीने स्वप्नात दर्शन दिले. तिच्या आदेशानुसार समुद्राच्या तळाशी असलेल्या देवींच्या तीन मूर्ती काढून त्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्रीच कँडीचा मार्ग सुकर झाला. मंदिर स्थापनेनंतर अनेक वर्षे त्याचा कारभार रामजी शिवजी आणि त्यांचे वंशज सांभाळत होते. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार आता मंदिराचे ट्रस्टी हा कारभार सांभाळत आहेत.मंदिरात एकत्र विराजमान असलेल्या महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती सोन्याच्या आहेत. सोन्यामोत्याच्या अलंकारांनी या मूर्तींची शोभा आणखीनच वाढते. मंदिराच्या परिसरातून वरळीचा समुद्रकिनारा आबालवृद्धांच्या आकर्षणात भर घालतो.
२५० वर्षे जुनी मुंबईची महालक्ष्मी
By admin | Updated: September 29, 2014 06:45 IST