दुष्काळमुक्ती : पाचोरा व अमळनेर नपा पाणीपुरवठा योजनेवर सात कोटी खर्चजळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हाभरात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली. टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २३ कोटी २७ लाखांचा खर्च झाला आहे. यासह पाचोरा व अमळनेर नगरपालिका पाणी पुरवठा योजनेवर सहा कोटी ९१ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
११९ गावांना १०३ टँकरद्वारे पाणी जिल्हा प्रशासनाकडून यावर्षी ११९ गावांमध्ये १०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यात सर्वाधिक २८ टँकर हे जामनेर त्यापाठोपाठ २१ टँकर पारोळा तालुक्यात सुरु होते. यासह अमळनेर २०, चाळीसगाव १४ तर जळगाव तालुक्यातील ९ टँकरचा समावेश होता.
२३ कोटी २७ लाखांच्या अनुदानाला मंजुरीजिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा, विंधन विहिर, विहिर खोलीकरण, तात्पुरती पाणी योजना, ८० गाव पाणी पुरवठा योजना, पाचोरा नगरपालिका तात्पुरती पाणी योजना यासाऱ्यावर २३ कोटी २७ लाख ११ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या पैकी विविध २० कोटी ९१ लाखांच्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दुष्काळमुक्तीजिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी यावर्षी सुयोग्य नियोजन केले होते. यावर्षी २७१ गावांमधील २७७ विहिरींचे अधिग्रहण केले. १०२ गावांमध्ये ८४ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. ५३६ गावांमध्ये १०३० नवीन विंधन विहिर घेण्यात येऊन ८७ गावांमध्ये १२५ नवीन कुपनलिका घेण्यात आल्या. ११७ गावांमध्ये विहिर खोलीकरण तर आठ गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करण्यात आली. पाणी टंचाईसाठी प्रभावी उपाययोजना व यावर्षी चांगल्या पावसामुळे दुष्काळमुक्ती झाली आहे.