मुंबई : पुणे जिल्ह्यातील माळीण गावच्या दुर्घटनाग्रस्तांना २२५ चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय झाला असला तरी खासगी कंपन्या सीएसआर फंडातून जादा बांधकामासाठी मदत देणार असतील तर आणखी मोठी घरे देण्यास राज्य शासन सहकार्य करेल, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगितले. या गावाच्या पुनर्वसनाचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात येईल आणि त्याच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. काँग्रेसचे अमित देशमुख यांनी माळीणच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे-पाटील यांनी २२५ चौरस फुटांपेक्षा मोठी घरे देण्याची मागणी केली. त्यासाठी खासगी कंपन्या निधी देण्यास तयार आहेत, काही एनजीओंनी पण मदतीची तयारी दर्शविली आहे, असे ते म्हणाले. पुनर्वसनासंदर्भात वळसे-पाटील देतील ती योजना मंजूर केली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. माळीणच्या पुनर्वसनासाठी ७ कोटी रुपये, तर इतर कामांसाठी ३ कोटी रुपये अशी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)दुर्घटनाग्रस्त ३० कुटुंबांसाठी ३० लाख रुपये खर्च करून तात्पुरते शेड आधीच उभारण्यात आले आहेत. आदर्श असे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल.
माळीणच्या दुर्घटनाग्रस्तांना २२५ चौ. फुटांची घरे
By admin | Updated: March 28, 2015 01:40 IST