मुंबई : नाशिकमधील कुंभमेळ्यास उपस्थित राहणाऱ्या भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रेनची सोय करण्यात आली होती. त्यामुळे शाही स्नानासाठी उपस्थित राहणाऱ्या आणि पुन्हा परतीचा मार्ग पत्करणाऱ्या भक्तांनी मध्य रेल्वेवरील नाशिकच्या गाड्यांमध्ये चांगलीच गर्दी केली. शाही स्नानाच्या ३५ दिवसांमध्ये तब्बल २१ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास होणारा हा रेकॉर्ड ब्रेक प्रवास असल्याचे सांगण्यात येते. नाशिक कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने ६0२पेक्षा जास्त विशेष ट्रेन सोडल्या, तर २५१ मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील ५८0 जनरल सेकंड क्लास डबे कुंभमेळा भक्तांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना २१ जादा डबेही जोडले. शाही स्नान सिंहस्थ कुंभमेळा २८ ते ३१ आॅगस्ट, १२ ते १५ सप्टेंबर, १७ ते २0 सप्टेंबर, २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान असल्याने या दिवसांत मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतील याचा अंदाज घेत मध्य रेल्वेने जय्यत तयारी केली. २७ आॅगस्ट ते ३0 सप्टेंबरपर्यंत नाशिकमध्ये रेल्वेने तब्बल १0 लाख ५२ हजार ४३८ प्रवाशांनी प्रवेश केला. याच दिवसांत नाशिकमधून निघण्यासाठी रेल्वेने ११ लाख ८ हजार ७८३ प्रवाशांनी प्रवास केल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ३५ दिवसांत २१ लाख ६१ हजार २२१ प्रवाशांनी प्रवास केल्याने मरेचा फायदा झाल्याचे सांगितले.
‘कुंभ’मुळे ३५ दिवसांत २१ लाख प्रवासी
By admin | Updated: October 2, 2015 04:08 IST