संतोष वानखडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ५ - गेल्या एका महिन्यांपासून आस लागून राहिलेल्या गणरायाची प्रतिक्षा अखेर संपली असून, सोमवारी घरोघरी विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचे थाटात स्वागत करण्यात आले. वाशिम जिल्ह्यात २०५ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’चा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आला.
सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातर्फे गावक-यांना ‘एक गाव-एक गणपती’ या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर, गावक-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याने २०५ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम साकारण्यात आला.
२०५ गावांमध्ये केवळ एका गणरायाची स्थापना झाली असून, येथे सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम राबविणार आहेत. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात गणरायांची स्थापना करण्याची लगबग सुरू होती. वाशिम शहरातील नगर परिषद रोडस्थित असलेल्या बाजारपेठेतून गणेशभक्तांनी गणरायांच्या आकर्षक मूर्ती घेऊन वाजत-गाजत मिरवणूक काढली.