मनपा आर्थिक संकटात : नगरसेवक मारताहेत आयुक्तांकडे चकरा नागपूर : मार्च महिना संपेपर्यंत महापालिका कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात गुंतली आहे. त्यामुळे सध्या झोन कार्यालय असो की मुख्यालय प्रत्येक ठिकाणी वसुलीचेच काम होताना दिसून येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात कपात केली जाणार असल्याची शक्यता दिसून येत असतानाच, आयुक्त कार्यालयात तब्बल २०० फाईल्स अडकून असल्याची माहिती पुढे आली आहे. अडकलेल्या फाईल्स मंजूर करण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.२०१५-१६ या वर्षासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे, तर २० फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची बैठक होणार आहे. आयुक्त आपला अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सादर करतात. त्यामुळे २० फेब्रुवारी रोजी आयुक्तांचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प १२०० ते १३०० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात स्थायी समितीने सादर केलेल्या १६४५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात कपात होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या विभागांसाठी ठेवलेल्या निधीतून संबंधित विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. परंतु आयुक्त बैठक घेऊन वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत आहेत. तसेच महापालिकेची तिजोरी खाली असल्यानेसुद्धा फाईल्स स्वाक्षरीसाठी पडून आहेत. नगरसेवक आपापल्या प्रभागाच्या फंडाशी जुळलेल्या फाईल्स क्लिअर करण्यासाठी स्थायी समिती कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. अडकलेल्या फाईल्स क्लिअर होत नसल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनीसुद्धा इतर फाईल्स स्वाक्षरीसाठी अडवून ठेवल्या आहेत. अशा परिस्थितीत स्थायी समिती कार्यालय परिसरात अनेक नगरसेवक चकरा मारीत फिरत आहेत.(प्रतिनिधी) अधिकाधिक फाईल्स मंजूूर करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार अधिकाधिक फाईल्स मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुक्त नवीन आहेत. त्यांना फाईल समजायला वेळ लागत आहे. त्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीही फाईल मंजूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी स्पष्ट केले.
२०० फाईल्स अडकल्या !
By admin | Updated: February 10, 2015 00:57 IST