पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप २० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही, प्रवेशाची पहिली फेरीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या तारखा जाहीर कधी होणार आणि प्रवेश प्रक्रिया राबवली कधी जाणार, याबाबत पालक प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पुण्यातील पहिली प्रवेश फेरी रखडलेली असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीचे नियोजन जाहीर होणार आहे. पुणे विभागाचा परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवर होणार आहे. दुसरीकडे लातूर, अमरावती, नागपूर, नाशिक, पनवेल, कोल्हापूर या विभागांची प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या विभागांकडून दुसऱ्या फेरीची तारीख त्वरित जाहीर करावी ही मागणी होत आहे. मात्र सर्व विभागातील पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी जाहीर करता येत नसल्याने अद्यापही २० हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशांच्या प्रतीक्षेत आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षित जागेवर दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्यातून या जागांसाठी ३० हजार अर्ज आले होते. त्यातील पहिल्या फेरीसाठी १० हजार अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
आरटीई प्रवेशापासून २० हजार विद्यार्थी वंचित
By admin | Updated: September 8, 2015 01:23 IST