यदु जोशी , मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील २० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. यातील १९ कर्मचारी हे नियमबाह्य भरतीमधील आहेत. हे सर्व महामंडळाच्या मुंबई मुख्यालयात कार्यरत होते. महामंडळात ७४ कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यातील १९ कर्मचाऱ्यांना महामंडळाने दोनवेळा कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिशीला कर्मचाऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली. ही स्थगिती अलीकडे न्यायालयाने उठविल्यानंतर त्यांच्या निलंबनाची कार्यवाही सुरू करण्यात आली. महामंडळाच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना ही भरती करण्यात आली होती. ना अर्ज मागविण्यात आले, ना मुलाखती वा लेखी परीक्षा झाली. सर्व नियम धाब्यावर बसवून नियुक्ती करण्यात आली होती. आज निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये रमेश कदम, त्याचा अटकेत असलेला साथीदार जयेश जोशी तसेच कदमच्या पीएचा भाऊ आदींचा समावेश आहे. महामंडळाचे पुणे येथील क्षेत्रीय व्यवस्थापक एच. व्ही. दळवी यांनाही आज निलंबित करण्यात आले. चार दिवसांपूर्वी त्यांना जालना येथे अटक झाली होती. रमेश कदम यांच्या सूतगिरणीकडे महामंडळाचे ९ कोटी रुपये नियमबाह्यरीत्या वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
साठे महामंडळातील २० कर्मचारी निलंबित
By admin | Updated: April 6, 2016 05:17 IST