ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 31 - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणा-या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून बुधवारी १४ जणांविरुद्ध १८०० पानी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. याप्रकरणाची गंभीरता व संवेदनशील लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली आहे. वैद्यकीय व शास्त्रीय भक्कम पुरावा असल्याने यातील संशयितांना निश्चित शिक्षा होईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
भ्रूण हत्याकांडातील मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब आप्पासाहेब खिद्रापुरे (वय ४२, रा. म्हैसाळ), गर्भलिंग निदान करणारा डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (६८, रा. कागवाड, ता. अथणी, जि. विजापूर), डॉ. रमेश व्यंकटेश देवगिरीकर (६४, रा. विजापूर), मृत स्वातीचा पती प्रवीण पतंगराव जमदाडे (३२, रा. मणेराजुरी), कंपौंडर उमेश जोतीराम साळुंखे (२६, रा. नरवाड, ता. मिरज), कांचन कुंतिनाथ रोजे (३५, रा. शेडबाळ स्टेशन, इंदिरानगर, ता. अथणी), औषधे पुरविणारे सुनील काशिनाथ खेडेकर (३५, रा. माधवनगर, ता. मिरज), भरत शोभाचंद गटागट (४८, रा. सांगली), एजंट सातगोंडा कलगोडा पाटील (६३, रा. कागवाड), यासिन हुसेन तहसीलदार (६०, रा. तेरवाड, जि. कोल्हापूर), संदीप विलास जाधव (३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), वीरगोंडा ऊर्फ बंडू रावसाब गुमटे (४४, रा. कागवाड), औषध विक्रेता प्रतिनिधी दत्तात्रय गेणू भोसले (३०, रा. ठाणे) आणि अर्भकांची विल्हेवाट लावणारा गवळी रवींद्र विष्णू सुतार (३०, रा. म्हैसाळ) या चौदा जणांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. पोलिस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लॅस्टिकच्या पिशव्यांत सापडले. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातून कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. खिद्रापुरेला अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली आहे.
तब्बल ८९ दिवसांच्या तपासानंतर अखेर पोलिसांनी १४ जणांविरूद्ध १८०० पानांचे दोषारोपपत्र बुधवारी न्यायालयात दाखल केले. याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले की, दोन मुली असलेल्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन, त्यांची कागवाड, विजापूर येथे सोनोग्राफी केली जात होती. त्यानंतर अशा महिलेस म्हैसाळ येथे आणून गर्भपात केला जात होता. याप्रकरणी चौदा जणांना अटक करण्यात आली होती. दहा ते पंधरा हजारासाठी संशयितांकडून हे कृत्य करण्यात येत होते. यात पुरूष जातीच्या अर्भकांचाही गर्भपात झाला आहे. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील गर्भ टॉवेलमध्ये गुंडाळून त्याची सकाळी विल्हेवाट लावली जात होती. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विनंती न्यायालयाला करणार आहोत.
पोलिसांनी वैद्यकीय व शास्त्रीय भक्कम पुरावे जमा केले आहेत. १९ अर्भकांचे अवशेष, रुग्णालयातील दस्तावेज, विविध कागदपत्रे यावरून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय काही जोडप्यांचा डीएनएचा अहवालही घेण्यात आला आहे. या प्रकरणात पुरूष जातीच्या अर्भकांचीही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. जोडप्यांची फसवणूक झाली असून लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आठ पैकी पाच गर्भ पुरूष जातीचे!
डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक पोलिसांनी जप्त केले होते. या अर्भकांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण ९ पैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात ५ पुरूष जातीचे, तर ३ स्त्री जातीचे अर्भक होते. यावरून केवळ पैशासाठीच गर्भपात केला जात असल्याचे उघड होते, असे शिंदे यांनी सांगितले. रुग्णालयातील कागदपत्रांच्या आधारे जोडप्यांची डीएनए तपासी करण्यात येत आहे. त्याचा अहवालही लवकरच प्राप्त होईल. तोही एक भक्कम पुरावाच असेल, असेही ते म्हणाले.
न्यायाधीशांसमोरच जबाब
या खटल्यात १४१ साक्षीदार आहेत. त्यापैकी ५५ जणांची साक्ष थेट न्यायाधीशांसमोरच नोंदविण्यात आली आहे. पोलिस तपासादरम्यानच त्यांचे जबाब घेण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधीशांसमोर जबाब घेण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे शिंदे म्हणाले.
सात तपास पथके
म्हैसाळ भ्रूणहत्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत शिंदे यांच्याकडे होता. या प्रकरणाची व्याप्ती व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी सात पथके नेमण्यात आली होती. त्यात ७ पोलिस अधिकारी व ३० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.
बेळगाव, कोल्हापूर कनेक्शन...
या प्रकरणाच्या तपासात कागवाड येथील सोनोग्राफी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली. या सोनोग्राफी सेंटरमधून केवळ डॉ. खिद्रापुरे याच्यासाठीच गर्भलिंग निदान केले जात नव्हते, तर बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील काही रुग्णालयेही यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत बेळगाव व कोल्हापूरच्या जिल्हा पोलिसप्रमुखांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. त्यांनी गोपनीय तपास करून पुढील कारवाई करावी, असे शिंदे म्हणाले. मुख्य संशयित खिद्रापुरे याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी आयकर विभागालाही पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.