बदलापूर : कुळगांव-बदलापूर पालिकेने शहरातील रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी १६१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात १०० आणि दुसऱ्या टप्प्यात ६१ कोटींची मागणी केली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरातील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे होणार आहे. महाराष्ट्रातील नागरी स्वराज्य संस्थांच्या नागरी पायाभूत व सार्वजनिक सुविधा निर्माण करणे व त्यांच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत नगरपालिका हद्दीतील १५ रस्त्यांचे काँँक्र ीटीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानुसार नगरपालिकेचे तांत्रिक सल्लागार एकोटेक इंजिनियर्स यांनी रस्ते प्रकल्पाचा १६१ कोटी ४१ लाखांचा प्रकल्प अहवाल तयार केला असून तो नगरपालिका संचनायाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तलाठी कार्यालय - वडवली चौक (६.६१ कोटी), गणेश चौक -शांती नगर (१०.५४ कोटी), समर्थ चौक ते बेरेज गेट (५.९३ कोटी), रमेशवाडी ते दुबे नाला (३ कोटी), दुबे नाला ते अंबरनाथ बदलापूर रस्ता (१०.२७ कोटी), आपटेवाडी नाका ते हनुमान मंदिर रस्ता (८.८८ कोटी) आदी रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार आहे.
कुळगाव-बदलापूरच्या रस्त्यांसाठी १६१ कोटी?
By admin | Updated: April 30, 2016 03:07 IST